नाशिक : नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी... गेल्या पाच ते दहा वर्षांत अशाप्रकारच्या भूमिका मांडून विरोध झालेल्या शहर बस वाहतुकीला ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि सेना आसुसलेले आहेत. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत आत्तापर्यंत किमान पाच वेळा बससेवा ताब्यात घेण्याचे प्रस्ताव फेटाळले गेल्यानंतर आता पुन्हा बससेवेची भुरळ भाजप- सेनेला पडली आहे.नाशिक महापालिकेत १९९२ साली लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली, त्यावेळी सर्व प्रथम बससेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी परिवहन समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक घोषित झाली. परंतु त्यावेळच्या सत्तारूढ कॉँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाल्याने हा विषय फेटाळण्यात आला. त्यानंतर आजवर हा विषय डॉ. शोभा बच्छाव (कॉँग्रेस), विनायक पांडे (शिवसेना), नयना घोलप (शिवसेना), अॅड. यतिन वाघ (मनसे) या महापौरांच्या कारकिर्दीत मांडण्यात आला आणि फेटाळला गेला होता. विनायक पांडे महापौर असताना तर इंदूर येथील बससेवेचा पहाणी दौरा काढण्यात आला होता. जेथे शासकीय सार्वजनिक वाहतूक सेवाच नव्हती, तेथे हा विषय नावीन्य आणि आकर्षणाचा ठरला. परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळ चांगली सेवा देत असल्याने खासगीकरण करायचे नाही, असे ठरवत अखेरीस हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि महापालिकेला बस खरेदीसाठी नेहरू अभियानातून शंभर बस खरेदी करण्यासाठी देण्यात येणारा निधी एसटी महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा काही स्वयंसेवी संथांनी बीआरटीएस हा सार्वजनिक वाहतुकीचा नवा प्रस्ताव मांडला. त्यानुसार अहमदाबाद येथील बीआरटीएस सेवेचा अभ्यास करण्यासाठी मंडळे पाठविण्यात आली. परंतु एकतर ही सेवा तोट्यात आणि दुसरे म्हणजे बससाठी स्वतंत्र मार्गिका करण्यासाठी लागणारे रुंद रस्ते याबाबत मतभेद असल्याने राज ठाकरे यांनीच हा विषय गुंडाळून ठेवण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळी बससेवेला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्याच शिवसेनेला सीएनजी बस सुरू करण्याचा नवा मुद्दा सापडला आहे.
विमान, मेट्रो आणि बससेवेचेही वेधजाहीरनामा.
By admin | Published: February 15, 2017 5:19 PM