नवी दिल्ली : ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा संस्थांनी देशाच्या संवेदनशील विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त अधिक कडक केला आहे. प्रवाशांची कसून चौकशी केली जात असून त्यांना बूट आणि बेल्टही काढण्यास सांगितले जात आहे.दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादसारख्या प्रमुख विमानतळांवर सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षा कवच अधिक बळकट केले आहे. सेकंडरी लँडर पॉर्इंट चेकच्या (एसलीपीएस) माध्यमाने विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची झाडझडती घेतली जाते. क्षेत्रात तैनात गस्ती पथकाला अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलाही प्रवासी सखोल तपासणीशिवाय टर्मिनल क्षेत्रात दाखल होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. विमानतळ सुरक्षेत तैनात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा सुरक्षा मोहिमांमध्ये जास्तीची कुमक तैनात केली जात असते. केंद्रीय गुप्तचर संस्थांद्वारे ज्या स्तरावरील धोक्याचे संकेत दिले जातील त्या आधारे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीत बदल केले जातील. प्रवाशांजवळ असलेले सामान आणि विमानात चढविल्या जाणाऱ्या सामानांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाईल. विद्यमान सुरक्षा परिस्थिती आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांचे आकलन लक्षात घेऊन तपासणीसंदर्भात निर्देश देण्यात आले असल्याचे सांगून हा अधिकारी म्हणाला की, विमानतळ परिसरातील पाळत वाढविण्यासाठी विविध ठिकाणांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कमांडोंची जलद कृती पथके (क्युआरटीएस) आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)विमानतळांवर विशेष पथके, बॉम्बस्क्वाड आणि श्वान पथक सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.भारतात नागरी उड्डयनासाठी विमानतळावर प्रवेशापूर्वी सर्व प्रवाशांची तपासणी होत नाही. या ठिकाणांवर कुठल्याही संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील सुरक्षा जवान तैनात केले जात आहेत. सर्व संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर ब्रसेल्स हल्ला आणि होळी लक्षात घेऊन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विमान प्रवाशांची आता बूट काढून तपासणी
By admin | Published: March 26, 2016 1:05 AM