नवी दिल्ली: G-20 परिषदेसाठी परदेशी पाहुणे भारतात येणे सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचत आहेत. केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग बायडेन यांचे स्वागत करणार आहेत. बायडेन एअरफोर्स वन विमानाने दिल्लीला पोहोचतील. एअर फोर्स वन सोबतच दुसरे बॅकअप विमानदेखील असेल.
अमेरिकेच्या एअर फोर्स वनला मिनी पेंटॅगॉन म्हणून ओळखले जाते. यामध्ये सर्व सुरक्षा उपकरणे बसवलेली आहेत. एअर फोर्स वनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे विमान सर्व प्रकारचे हल्ले टाळण्यास सक्षम आहे. जमिनीवर न उतरता या विमानात इंधन भरले जाऊ शकते आणि हे एकाच वेळी न थांबता 12 हजार किमीचा प्रवास करू शकते.
50 वाहनांच्या ताफ्यात दिल्लीत फिरणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन विमानाने दिल्लीत उतरल्यानंतर त्यांच्या बीस्ट वाहनाने प्रवास करतील आणि सुमारे 50 वाहनांचा सुरक्षा घेरा त्यांच्यासोबत असेल. बीस्ट व्हेईकलबद्दल असे मानले जाते की, या गाडीत आण्विक हल्ल्यालाही हाणून पाडण्याची क्षमता आहे. कारला 8 इंच जाड दरवाजे, पॅनिक बटण, स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा, सॅटेलाईट फोनसारख्या सुविधा आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ताफ्यात 50 सुरक्षा वाहने असतील. सुरक्षेमध्ये यूएस इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी सर्व्हिस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तसेच फॉरेन इंटेलिजेंस सर्व्हिस सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी, म्हणजेच सीआयए कमांडो तैनात केले जातील.