नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात विमानामध्ये एका रांगेतील तीन आसनांपैकी मधले आसन फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रिकामे ठेवण्याचा प्रस्ताव बहुतांश विमान कंपन्यांना मान्य नाही. ही आसने रिकामी न ठेवण्यासाठी प्रवाशांनी रोगप्रतिबंधक पोशाख (पीपीई) घालावेत असा प्रस्ताव आहे. मात्र हे बंधन प्रवाशांना आवडणार नाही, असे मत एअर इंडियाचे माजी संचालक जितेंद्र भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
जितेंद्र भार्गव म्हणाले की, विमानात एकाच रांगेत तीन आसनांपैकी मधले आसन रिकामे ठेवायचे नसेल तर प्रवाशांनी पीपीई परिधान करायला हवा असे नागरी हवाई वाहतूक संचालकांनी म्हटले आहे. मात्र अशा पोशाख घालण्यास प्रवासी राजी होतील का याबाबत शंका आहे. त्यामुळे मधल्या आसनाच्या बुकिंगवरून भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात व विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशाला तिकीट दरात सवलत देऊन त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न विमान कंपन्यांना करावा लागेल, असे बोलले जात आहे.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सेवा सुरू होणार नाही, असे सांगितले जात होते. पण विमान कंपन्यांचा सरकारवर मोठा दबाव आहे. त्यामुळे चौथा टप्पा जाहीर केल्यानंतर चारच दिवसांत देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सरकारला करावी लागली.===' विमानात संसर्ग नाही 'विमानातून प्रवास करताना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाही असा दावा इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे. विमानात सर्व प्रवासी एका दिशेत बसतात. त्यांच्या तोंडावर मास्क असतो. आसनाच्या मागची उंच बाजू ही एखाद्या अवरोधासारखे काम करते. विमानातील एसी यंत्रणेत हवा वरच्या बाजूने येते व ती परत खालून विमानाबाहेर जाते. वातावरणातून दर दोन मिनिटाला हवा घेतली जाते, ती शुद्ध करून मग केबिनमध्ये सोडली जाते. या हवेचे पुर्नअभिसरण करण्यात येत नाही. त्यामुळे विमानात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताच नाही असा विमान कंपन्यांचा दावा आहे.