कोलकाता : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प. बंगालने मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या सहा शहरांतून येणाऱ्या विमानांवर ३१ जुलैपर्यंत बंदी घातली आहे.
ममता बॅनर्जी सरकारने याआधी ६ जुलै ते १९ जुलै या कालावधीकरिता आंतरदेशीय विमानसेवेवर पश्चिम बंदी लादली होती. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ठिकाणांहून कोलकाताला विमाने पाठविणे थांबवा अशी विनंती त्या राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याच्या सचिवांना पत्र लिहून केली होती. कोलकाता येथे आंतरदेशीय विमाने येऊ देण्यास ममता बॅनर्जी सरकारने २९ मेपासून परवानगी दिली होती. मागील दोन महिन्यांत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही असे हमीपत्र प्रत्येक प्रवाशाकडून लिहून घेण्यात येत होते.
या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ३८ हजारांवर झाली आहे. सध्या १४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील विमानतळांवर प्रवाशांची व्यवस्थित आरोग्य तपासणी होत नाही. त्यामुळे काही वेळेस कोरोना रुग्णांनी देखील विमानप्रवास केल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच केला होता.