हैदराबाद : अॅन्टोनोव्ह अॅन-२२५ म्रिया हे जगातील सर्वात मोठे कार्गो विमान शुक्रवारी भल्या पहाटे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि चर्चेचा विषय बनले आहे. तुर्कमेनिस्तानहून आलेल्या या अजस्त्र विमानाचे हे भारतातील पहिले लँडिंग ठरले.अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने गेल्या महिन्यात युक्रेनच्या अॅन्टोनिक कंपनीसोबत विमानाच्या सुट्या भागांची जुळवणी, उत्पादन आणि देखभालीसाठी वाणिज्य आणि लष्करी बाजारपेठा अशा दोहोंच्या सोयीने करार केला होता.रिलायन्स डिफेन्सने अॅन्टोनोव्हशी केलेल्या करारानुसार ५० व ८० आसनी प्रवासी विमानांच्या गरजांची पूर्तता संयुक्तरीत्या केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अॅन्टोनोव्हच्या या विमानाला भारताची हवाई सफर घडली आहे. वायुदल,लष्कर आणि निमलष्कर दलांसाठी सर्व तांत्रिक मदतीसाठी भारताला २०० मध्यम टर्बोफॅन मालवाहू विमानांची गरज असून त्यावर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हैदराबादेत उतरले अजस्र विमान
By admin | Published: May 14, 2016 3:11 AM