ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - भारताचे माजी हॉकीपटू मीर रंजन नेगी यांना सीमा शुल्क विभागातून निलंबित करण्यात येऊ शकते. नेगी कस्टममध्ये सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. एअर कार्गो कॅम्पलेक्स भ्रष्टाचारा प्रकरणी नेगी आणि त्यांच्या सहका-यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. बॉलिवूडमधला गाजलेला "चक दे इंडिया" सिनेमा नेगी यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला होता.
कस्टमचे मुख्य आयुक्त देवेंद्र सिंह यांनी सीबीईसीला लिहीलेल्या पत्रात मीर रंजन नेगी आणि व्ही.एम.गानू या दोघांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. एअर कार्गो कॅम्पलेक्सशी संबंधित असणा-या या दोघांची नुकतीच बदली करण्यात आली. मागच्या आठवडयात देवेंद्र सिंह यांनी एअर कार्गो कॉम्पलेक्समधल्या भ्रष्टाचारा प्रकरणी 17 अधिका-यांना निलंबित केले.
दक्षता खात्याकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी यावर आता कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल असे नेगींनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. व्ही.एम.गानू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इथे निलंबनाची प्रक्रिया वेगळी आहे. नेगी आणि गानू यांची कमी महत्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे असे देवेंद्र सिंह यांनी सांगितले.
आणखी वाचा
एअर कार्गो कॉम्पलेक्स देशातील सर्वात जुना आणि मोठा कॉम्पलेक्स आहे. इथून 14 हजार कोटींचा महसूल गोळा होतो. मागच्या तीन महिन्यात सीबीईसीने कॉम्पलेक्समध्ये चालणारी तस्करीची वेगवेगळी रॅकेटस उघड केली आहेत. यातून देखरेख ठेवणार यंत्रणा किती कुचकामी आहे ते दिसून आले. मे महिन्यात कस्टमच्या केंद्रीय गुप्तचर युनिटने एअर कार्गो कॉम्पलेक्सची अचानक तपासणी केली. त्यावेळी 26 कोटी रुपयांचा कर चुकवून मोबाईल फोन आणि सामानाची तस्करी सुरु होती.
त्यानंतर मीर रंजन नेगी कस्टमच्या रडारवर आले. दक्षता संचलानलयाच्या सूचनेवरुन 11 अधिका-यांची बदली करण्यात आली. नेगी यांच्याकडे मालच्या तपासणीची जबाबदारी होती. ज्यांची बदली करण्यात आली ते अधिकारी थेट मीर रंजन नेगी यांच्या हाताखाली काम करायचे अशी माहिती सूत्रांनी दिली.
चक दे इंडिया
बॉलिवूडचा गाजलेला "चक दे इंडिया" सिनेमा हा नेगी यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. भारतीय हॉकी संघाचे माजी गोलकीपर राहिलेल्या नेगी यांना पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अपमानास्पद अनुभव आले होते. 1982 साली आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम लढतीत सात गोल्सनी पराभव झाल्यानंतर त्यांना वाईट अनुभव आले होते. पण त्यानंतर 16 वर्षांनी 1998 साली त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. चक दे मध्ये अभिनेता शाहरुख खानने नेगींची भूमिका साकारली आहे.