ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२३ - एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान एका एअरहोस्टेसला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये जबरदस्तीने बसवणा-या पायलटला स्पाइसजेटने निलंबित केले आहे. या आरोपी पायलटने केवळ त्या एअरहोस्टेसला जबरदस्तीने कॉकपिटमधील आपल्या सीटवरच बसवले नाही तर आपल्या सहवैमानिकालाही कॉकपिटच्या बाहेर काढले होते. २८ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथून बँकॉकला जाणा-या विमानात ही घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी सुरू होती, अखेर दोन महिन्यांनी स्पाइसजेटने त्या वैमानिकाला निलंबित केले आहे.
कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कॉकपीटमध्ये पायलटच्या जागेवर बसवणे हे नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जाते. तसेच विमानात एअर होस्टेसचे केले जाणारे शारीरिक शोषण हाही एक गंभीर गुन्हा आहे. दरम्यान या आरोपी पायलटने त्याच दिवशी परत येताना रात्रीच्या वेळेस पुन्हा ही लज्जास्पद वर्तणूक केली होती.