मुंबई, दि. 14 - एखाद्या ग्राहकाला कंपनीकडून वाढीव बिल आल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण एअरटेलने आपल्या ग्राहकाला पाठवलेलं बिल पाहून तुम्हाला धक्काच बसेल. एअरटेलने आपल्या ग्राहकाला तब्बल एक लाख 86 हजार 553 रुपयांचं बिल पाठवलं आहे. दिल्लीमधील नितीन सेठी यांना हे बिल पाठवण्यात आलं आहे. नितीन सेठी एका कंपनीत व्हाईस प्रेजिडेंट म्हणून काम करत असून, बिल मिळाल्यानंतर त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
इंडिया टुडे वेबसाईटच्या वृत्तानुसार नितीन सेठी यांचं हे बिल 8 जुलै 2017 रोजी जनरेट करण्यात आलं. ग्राहकाने 1 लाख 86 हजार 553 रुपयांची सेवा वापरली, तर याची क्रेडिट लिमिट 14 हजार रुपयांपर्यंत आहे, असं बिलामध्ये म्हटलं होतं.
नितीन यांनी बिल मिळाल्यानंतर तात्काळ कस्टमर केअरशी संपर्क साधला होता, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. सुरुवातीला त्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचं मान्य केलं होतं, मात्र काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. यानंतरही एअरटेलने नितीन सेठींशी कोणताही संपर्क साधला नाही, किंवा कस्टमर केअरकडूनही कोणतं आश्वासन देण्यात आलं नव्हतं.
'जेव्हा मला बिल मिळालं तेव्हा मला धक्काच बसला. मी तात्काळ कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यांनी मला हा तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं. पण काहीच कारवाई केली नव्हती', अशी माहिती नितीन सेठी यांनी दिली होती. कस्टमर केअरशी संपर्क साधणंही खूप जिकीरीचं असल्याचं नितीश सेठी यांनी सांगितलं. मात्र तरीही नितीन यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले होते.
अखेर नितीन सेठी यांनी हा सर्व प्रकार फेसबूकवर शेअर केला. नितीन सेठी यांनी फेसबुकवर हा शेअर केल्यानंतर एअरटेलकडून दखल घेण्यात आली. तांत्रिक कारणामुळे ही चूक झाल्याचं कंपनीने मान्य केलं आणि दुरुस्त बिल दिलं. नितीन सेठी यांनी सामोरं जावं लागलेल्या न्यायलयात जाऊन दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याआधीच समस्या सोडवल्याने कोर्टाच्या पाय-या चढाव्या लागणार नाही आहेत.