लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने करमुक्त देशामध्ये कंपनी स्थापन करून करचोरी केल्याची आणि परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती उघड झाल्यामुळे सोमवारी तिची ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. याआधी दोनदा तिला समन्स पाठवण्यात आले होते.
भारतातील अनेक नामवंतांनी करमुक्त देशांत कंपन्या स्थापन केल्याची माहिती पनामा कागदपत्रांतून उघड झाली होती. त्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचेही नाव आहे. ऐश्वर्या रायने २००५ साली ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये ॲमिक पार्टनर्स लिमिटेड ही कंपनी सुरू केली. त्या अनुषंगाने परकीय चलन विनिमय कायद्याच्या अंतर्गत ही चौकशी केली.
प्रकरण काय?
मोझेक फोन्सेका (एमएफ) ही पनामा येथील संस्था लोकांना विदेशात कंपनी स्थापन करण्यासाठी मदत करते. एमएफच्या कागदपत्रांमध्ये ऐश्वर्या राय व तिचे कुटुंबीय ॲमिक पार्टनर्स या कंपनीचा भाग होते, असे उल्लेख आहेत. ऐश्वर्या राय यांचे वडील, आई व भाऊ या तिघांना १४ मे २००५ रोजी ॲमिक पार्टनर्सचे संचालक म्हणून नेमण्यात आले होते. या कंपनीचे सुरुवातीचे भागभांडवल ५० हजार डॉलर्स इतके दाखविले.
बंद कंपनीची पुन्हा नोंदणी
- राय कुटुंबीयांना १८ जून २००५ रोजी ॲमिक पार्टनर्सचे भागधारक केले. ऐश्वर्या राय या नावाचे ए. राय असे लघुरूप नोंदविण्यास सांगितल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये केला आहे.
- ऐश्वर्या हिने अभिषेक बच्चन यांच्याशी विवाह केल्यानंतर एक वर्षाने ॲमिक पार्टनर्स ही कंपनी बंद केली. आणि २००७ साली या कंपनीची पुन्हा नोंदणी केली.
जया बच्चन यांचा शाप
स्नुषा ऐश्वर्या यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत संताप व्यक्त केला. तुमचे वाईट दिवस लवकरच येतील, मी तसा शाप तुम्हाला देते, असे त्या भाजप खासदारांना म्हणाल्या. त्यांना दम लागल्याने काही विपरित घडते की काय, अशी भीती वाटली व कामकाज तहकूब करण्यात आले.