नवी दिल्ली : देशातील १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण पुरविणा-या आयुषमान भारत या योजनेच्या अंमलबजावणीतून एक लाख नव्या नोक-या निर्माण होणार आहेत. रुग्णांना योजनेचा फायदा मिळावा यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता खासगी व सरकारी रुग्णालयांत एक लाख ‘आयुषमान मित्रांची' नियुक्ती करण्यात येणार आहे.या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने कौशल्य विकास मंत्रालयाशी करार केला आहे. सूत्रांनी सांगितले की, या योजनेचे फायदे रुग्णाला मिळावेत यासाठी तो व रुग्णालयामध्ये समन्वय साधण्याचे काम आयुषमान मित्र करणार आहे. प्रत्येक रुग्णालयात मदतकक्ष उघडण्यात येणार असून तिथे रुग्णाची कागदपत्रे तपासून तो योजनेसाठी पात्र आहे की नाही हे त्याला सांगितले जाईल. २० हजार खासगी व सरकारी रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत.>योजनेत सहभागी होण्यास सक्ती नाही!आयुषमान भारत योजनेचे नेमके कोण लाभार्थी होऊ शकतील, याची पडताळणी सामाजिक आर्थिक जातवार गणनेतील माहितीच्या आधारे सध्या सुरु आहे. ग्रामीण भागातील ८० टक्के व शहरातील ६० टक्के लाभार्थींची नावे निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे.लाभार्थींना क्यूआर कोड असलेली पत्रे देण्यात येणार असून, त्यामुळे त्यांची ओळख व अन्य माहिती तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी रुग्णालयावर सक्ती करण्यात येणार नाही. किमान १० खाटांच्या कोणत्याही रुग्णालयाला या योजनेत सहभागी होता येणार आहे.
‘आयुषमान’मुळे १ लाख नोकऱ्या, रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आता ‘आयुषमान मित्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 4:00 AM