Ajay Devgan : अजय देवगणचे कडक व्रत, 41 दिवस ब्रह्मचर्याचे पालन अन् अनवाणी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 05:57 PM2022-01-13T17:57:10+5:302022-01-13T17:59:13+5:30
Ajay Devgan : 41 दिवस काळे कपडे परिधान करणे, ब्रह्मचर्याचे पालन, अनवाणी राहणे, जमीनीवर झोपणे, दररोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीची माळ घालून अजयने हे व्रत पूर्ण केले आहे.
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने बुधवारी केरळच्या सबरीमला मंदिरात जाऊन अयप्पा स्वामींचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे अजयने गेल्या 41 दिवसांपासून अयप्पा स्वामींचे व्रत धरले होते. डोक्यावर इरुमूड़ी घेऊन अभिनेत्याने सन्निधानम बसरीमाला मंदिरात प्रवेश केला होता. मंदिरात जाताना काळे कपडे परिधान केलेला, तोंडाला मास्क लावलेला आणि डोक्यावर इरुमुडी घेतलेला अजय देवगणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
स्वामी अयप्पांच्या दर्शनासाठी अजयने कडक असे 41 दिवसांच्या उपवासाचे व्रत धरले होते. 41 दिवस काळे कपडे परिधान करणे, ब्रह्मचर्याचे पालन, अनवाणी राहणे, जमीनीवर झोपणे, दररोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीची माळ घालून अजयने हे व्रत पूर्ण केले आहे. त्यानंतर, 41 दिवसांनी सबरीमाला मंदिरात जाऊन भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. त्यावेळी, तेथील पुजाऱ्यांनी अभिनेत्याला प्रसाद दिला. अजयनेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काळ्या कपड्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अजय देवगणच्या अगोदर अमिताभ बच्चन यांच्यापासून ते विवेक ओबेरॉयपर्यंत अनेकांनी हे कठीण व्रत पूर्ण केले आहे. केरळमधील हे मंदिर 800 वर्षांपूर्वीचे जुने असून चारी बाजूंनी डोंगरांनी व्यापलेलं आहे. या मंदिरात जाण्यासाठी पवित्र अशा 18 पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्यांचा वेगवेगळा अर्थ आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीतच हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. अयप्पांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना 41 दिवसांचे व्रत बंधनकारक आहे.
दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपट कैथीच्या रिमेकमध्ये अजय देवगण दिसून झळकणार आहे. हिंदीत या चित्रपटाचे नाव 'भोला' असेल. अजय देवगण सिंघम 3 चित्रपटाचीही तयारी करत आहे.