नवी दिल्ली - काँग्रेस नेते अजय माकन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीबाबत सुरू असलेला हा खेळ नीट समजून घ्या असं म्हटलं आहे. तसेच "आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. तर दुसरीकडे भाजपा सरकार मात्र इंधनांच्या किंमतीत सातत्याने वाढ करत आहे. आता तर हे भाव खूपच वाढले आहेत. याच थेट परिणाम शेतकरी, सामान्य जनता आणि वाहतूक यंत्रणेवर पडत आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मोदी सरकारने सरकारने पेट्रोल आणि डिझेलमधून कमावलेले 20 लाख कोटी गेले कुठे?" असं अजय माकन यांनी म्हटलं आहे.
"26 मे 2014 रोजी भाजपने केंद्रात सत्ता आपल्या हाती घेतली होती. तेव्हा भारतातील तेल कंपन्यांना 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलने कच्चं तेल आयात करावं लागत होतं. मात्र तेव्हा दिल्लीत पेट्रोल 71.51 रुपये प्रती लीटर, डिझेल 57.28 रुपये प्रती लीटर तसंच एलपीजी 414 रुपये प्रती सिलिंडरने उपलब्ध होता. 22 जानेवारी 2021 रोजी कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय दर 55.52 अमेरिकन डॉलर प्रती बॅरल आहे. परंतु दिल्लीत मात्र पेट्रोल आजवरच्या रेकॉर्डतोड भावानं म्हणजे 85.70 रुपयांनी, डिझेल 75.88 रुपयांनी तर घरगुती गॅसचा सिलिंडर 694 रुपयांनी मिळतोय' असं माकन यांनी म्हटलं आहे.
"भाजप सरकारने गेल्या सहा वर्षांत पेट्रोलवर एक्साइज शुल्कात 23.78 रुपये प्रती लीटर तर डिझेलवर 28.37 रुपये प्रती लीटरची वाढ केली. म्हणजेच, पेट्रोलच्या एक्साइज शुल्कात 258 टक्क्यांनी तर डिझेलच्या एक्साइज शुल्कात 820 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्यातून गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज शुल्कातून जवळपास 20 लाख कोटी म्हणजेच 200 खरब रुपये कमावलेत' असं देखील अजय माकन यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरचा दर वाढवल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. काँग्रेसच्या काळात 414 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होता. आज दिल्लीत हाच सिलिंडर 694 रुपयांनी उपलब्ध होत आहे. गॅसवरची सबसिडी जवळपास संपुष्टात आणली गेली आहे. मोदी सरकारने वाढवलेले एक्साइज शुल्क परत घेतलं तर पेट्रोल 61.92 रुपये आणि डिझेल 47.51 रुपयांत नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असं अजय माकन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.