नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:27 AM2024-03-24T06:27:02+5:302024-03-24T06:47:02+5:30

काँग्रेसने आज १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या ४५ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.

Ajay Rai against Narendra Modi; 4 Congress candidates announced in Vidarbha, but Chandrapur in the bouquet | नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी चार मतदारसंघांसाठी आज काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान या चार उमेदवारांची नावे आज रात्री काँग्रेसने जाहीर केली. मात्र, चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवले आहे.

चंद्रपूर मतदारसंघामध्ये दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यातच मतदान होणार असूनही काँग्रेसने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. 

काँग्रेसने आज १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या ४५ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशातूनच अजय राय (वाराणशी), इम्रान मसूद (सहारनपूर), प्रदीप जैन आदित्य (झांशी), अखिलेश प्रताप सिंह (देवरिया) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले चौधरी लाल सिंह हे जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर मतदारसंघातील उमेदवार असतील. काँग्रेसने राजस्थानचा नागौर मतदारसंघ मित्रपक्ष आरएलपीसाठी सोडला आहे.

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत आसाम (१), अंदमान निकोबार (१), छत्तीसगढ (१), जम्मू आणि काश्मीर (१) मध्य प्रदेश (११), महाराष्ट्र (४), मणिपूर (२), मिझोराम (१), राजस्थान ((२), तामिळनाडू (७), उत्तर प्रदेश (७), उत्तराखंड (२) आणि पश्चिम बंगाल (१) या राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे.

वाराणसीत नरेंद्र मोदींविरोधात अजय राय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय हे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार असतील. मध्य प्रदेशच्या राजगढमधून ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह मैदानात उतरणार आहेत, तर रतलाम मतदारसंघातून कांतीलाल भुरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

तामिळनाडूच्या सिवगंगा मतदारसंघातून विद्यमान खासदार कार्ती चिदंबरम लढणार आहेत. लोकसभेत भाजपचे रमेश बिधुरी यांच्या शिवराळ भाषेचे लक्ष्य झालेले खासदार दानिश अली यांना उत्तर प्रदेशच्या अमरोहा  मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दानिश अली याच मतदारसंघातून बसपच्या तिकीटावर निवडून आले होते. 

Web Title: Ajay Rai against Narendra Modi; 4 Congress candidates announced in Vidarbha, but Chandrapur in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.