लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर येत आहेत. वाराणसीमधील मेहंदीगंज येथे नरेंद्र मोदी हे १८ जून रोजी ५० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याबरोबरच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे २० हजार कोटींची भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मोदींवर टीका केली आहे. सर्वकाही गुजरातच्या लोकांना देण्यात आलं आहे, तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं विधान अजय राय यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना अजय राय म्हणाले की, वाराणसीमध्ये कारखान्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कारखान्यांबाबत काहीतरी घोषणा केली पाहिजे. सर्व काही गुजरातच्या लोकांना देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचा यावेळी केवळ १.५ लाख मतांनी विजय झाला आहे. हा एकप्रकारे मोदी यांचा नैतिक पराभव आहे, असा टोलाही अजय राय यांनी लगावला.
दरम्यान, योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतील. त्याशिवाय ते अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. वाराणसी दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे मेहंदीगंज येथे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचं वितरण करतील. त्यानंतर विश्वनाथ धाम येथे दर्शन-पूजन करून दशाश्वरमेध घाट येथे गंगा आरतीमध्ये सहभागी होतील.