हरीश गुप्ता नवी दिल्ली : पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. त्यांची या पदावरील दुसरी कारकीर्द पाच वर्षांची असून ती पूर्वलक्षी प्रभावाने ३१ मेपासून सुरू झाली.
सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या विश्वासू सहकाºयांमध्ये डोवाल यांचा समावेश होतो. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या फेरनियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१४ साली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला होता. फेरनियुक्ती झालेले ते पहिलेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
भारताचे माजी परराष्ट्र सचिव व आता परराष्ट्रमंत्री बनलेले एस. जयशंकर हे प्रशासकीय कारकीर्दीच्या दृष्टीने अजित डोवाल यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. जयशंकर थेट कॅबिनेट मंत्री झाल्याने डोवाल यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा द्यावा लागला. बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांच्या नियोजनात डोवाल यांचा मोठा वाटा होता. डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने जी घुसखोरी केली त्यामुळे भारत व चीनमध्ये सुमारे ७३ दिवस तणावाचे वातावरण होते. त्याकाळात डोवाल यांनी भारताची बाजू लढवली. चीनला डोकलाममधून आपले सैन्य मागे घ्यावे लागले होते. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यात डोवाल यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले.
चतुर कारकीर्दीचे धनीअजित डोवाल हे १९६८च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी सुमारे ३३ वर्षे गुप्तचर अधिकारी म्हणून जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत, पंजाबमध्ये काम केले. सैन्याकडून देण्यात येणाºया कीर्ती चक्राने सन्मानित झालेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदावरून ते २००५ साली निवृत्त झाले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या नियोजनातही त्यांनी विशेष भूमिका बजावली होती