बीजिंग, दि. 28 - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ‘ब्रिक्स’समुहातील ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेण्यासाठी ते चीनमध्ये आहेत. या दरम्यान डोवाल यांनी आज चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कोणतंही अधिकृत विधान देण्यात आलेलं नाहीये. मात्र, भेटीआधी सर्व ब्रिक्स देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र यायला हवं असं डोवाल म्हणाले होते.अजित डोवाल हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताबाबतची भूमिका काहीशी नरम केली आहे. दोन दिवसांपूर्वी चीनची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या झिनहुआने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताच्या अर्थव्यवस्थेचे कार्यक्षम व्यवस्थापन केल्याबद्दल प्रशंसा केली होती. याशिवाय या वृत्तामध्ये भारत आणि चीनमध्ये व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या व्यावसायिक क्षेत्रासाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याने या वृत्ताद्वारे चीनच्या उच्चपदस्थ नेतृत्वाने दोन्ही देशांतील लष्करी वाद मिटवण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. सिक्कीमजवळील भारत-चीन सीमावादाबद्दल डोवल यांनी एक दिवसापूर्वी चीन सरकारचे सीमासुरक्षा सल्लागार यँग जेईचे यांचीही भेट घेतली . काही दिवसांपूर्वी भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. शिवाय, अनेक दिवसांपासून चिनच्या वृत्तपत्रांमधून भारताला जाहीरपणे धमक्या दिल्या जात आहेत.काय आहे डोकलाम प्रकरण-डोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. भारतीय लष्करानं चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखलं आहे. चीनच्या मते तो भूभाग स्वतःच्या मालकीचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील, असाही आहे. सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे. चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, तेव्हापासून दोन्ही देशातील सैन्यामध्ये तणाव वाढत आहे.
अजित डोवाल सोडवणार डोकलाम वाद? घेतली जिनपिंग यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 9:41 PM
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ‘ब्रिक्स’समुहातील ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेण्यासाठी ते चीनमध्ये आहेत.
ठळक मुद्देभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. डोवाल यांनी आज चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांची भेट घेतलीअजित डोवाल हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताबाबतची भूमिका काहीशी नरम केली आहे.