अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:36 AM2024-09-09T05:36:29+5:302024-09-09T05:38:05+5:30
भारताची भूमिका महत्त्वाची मेलोनी जगभरातील अनेक नेते आता रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे मानत आहेत.
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची 'सिक्रेट' जबाबदारी सोपवविल्याचे वृत्त आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीने या आठवड्यात अजित डोभाल रशिया दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात रशिया आणि युक्रेनचा दौरा करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी युद्ध थांबवण्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी २७ ऑगस्ट रोजी व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यात मोदींनी युद्ध संपुष्टात आणण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. याच फोन कॉलदरम्यान डोभाल शांतता चर्चेसाठी मॉस्कोला जातील, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुतिन यांनाही भारताकडून आशा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही नुकतेच आपण चीन, ब्राझील आणि भारताशी युक्रेन युद्धासंदर्भात सतत संपर्कात आहोत, असे सांगत भारत याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संकेत दिले होते. भारताची भूमिका महत्त्वाची मेलोनी जगभरातील अनेक नेते आता रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे मानत आहेत. त्यातच शनिवारी एका कार्यक्रमात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही भारत, चीन हा प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ९२६ दिवसांपासून सुरू आहे युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. या युद्धाला ८ सप्टेंबर २०२४ रोजी ९२६ दिवस पूर्ण झाले. २०२१ पासूनच रशियाने या युद्धाची तयारी केली होती.