गुरुग्राम - पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश विसरलेला नाही आणि विसरणार नाही असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80 व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (19 मार्च) हरयाणातील गुरुग्राम येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
'अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असते. दुसऱ्या महायुद्धानंतर 37 देश असे होते जे उद्धवस्त झाले आणि आपले सार्वभौमत्व गमावून बसले. यामधील 28 देशांचे कारण त्यांचा देशांतर्गत संघर्ष हे होते. देश दुबळा असतो कारण त्याची अंतर्गत सुरक्षा कमजोर असते, त्यामुळे याची जबाबदारी सीआरपीएफवर येते' असं सीआरपीएफचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना डोवाल यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताच्या फाळणीवेळी सीआरपीएफच्या योगदानाचे कौतुक केले. कदाचित लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची भुमिका निभावली त्यावर एक पुस्तक लिहीले जाऊ शकेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 'सीआरपीएफच्या गणवेशाशी आणि भारताच्या सुरक्षेशी मी 51 वर्षांपासून जोडलो गेलो आहे. यांपैकी 37 वर्षे मी पोलीस खात्याचा भाग होतो. मला लष्कर आणि पोलिसांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, आपल्या बलाचे काही वैशिष्ट्ये आहेत. हेच एक बल आहे ज्यामध्ये इतकी विविधता आहे. व्हीआयपी सुरक्षा, दहशतवाद, कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली तिथे सीआरपीएफने महत्त्वाचे योगदान दिले' असे म्हटले आहे.
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान हवाई दलानं धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारताने काही दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली होती. यावेळी समितीच्या सदस्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कारवाईची संपूर्ण माहिती दिली होती. हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईत जैशचे 25 टॉप कमांडर मारले गेल्याचं डोवाल यांनी समिती सदस्यांना सांगितलं होतं. 'भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे बहुतांश टॉप कमांडर मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यात जैशचं मोठं नुकसान झालं,' अशी माहिती त्यांनी दिली होती.
बालाकोट जैशचा सुरक्षित बालेकिल्ला समजला जातो. हा भाग चहूबाजूंनी जंगलांनी वेढलेला आहे. जैशचा सुरक्षित तळ मानला जाणारा बालकोट उद्ध्वस्त झाल्यानं जैशला हादरा बसला. हा तळ साधासुधा नव्हता, असं अजित डोवाल समितीच्या बैठकीत म्हणाले होते. 'नष्ट करण्यात आलेल्या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, स्फोटक परीक्षण सुविधा, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालयं होती. याशिवाय या तळावर स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र यासारख्या सोयीदेखील होत्या. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून या सुविधा पुरवल्या जात होत्या,' अशी महत्त्वपूर्ण माहिती डोवाल यांनी दिली होती.