नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मसूद अजहरचा दाखल देत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याविरुद्ध केलेला दावा खोटा ठरला आहे. संरक्षण प्रतिष्ठानच्या सुत्रांच्या माहितीवरुन राहुल गांधींचा हा दावा खोडून काढल्याचे वृत्त नवभारत टाईम्स या वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे. तसेच, ज्यावेळी कंदहार विमान अपहरण झाले होते, त्यावेळी अजित डोवाल हे आयबीमध्ये अॅडिशनल डायरेक्टर होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र, भाजपावर टीका करण्याच्या भारात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहर यांचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. तसेच भाजपाच्या याआधीच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. त्यावेळी, अजित डोवाल हे स्वत: मसूद अजहरला सोडायला गेले होते, असेही राहुल यांनी म्हटले होते. मात्र, राहुल गांधींचा हा दावा खोटा ठरविण्यात येत आहे.
भारतीय एअरलाईन IC 814 या अपहरण करण्यात आलेल्या विमानात ओलीस ठेवलेल्या 161 प्रवाशांच्या सुटकेसाठी मसूद अजहरला ज्या विमानातून नेले, त्या विमानात अजित नव्हते. कारण, त्यावेळी डोवाल हे आयबीमध्ये अतिरिक्त संचालक होते, असा दावा एनबीटीने संरक्षण प्रतिष्ठानच्या हवाल्याने केला आहे. डोवाल हे मसूद अजहराची सुटका करण्यापूर्वी आयएसआय, अपहरणकर्ते आणि तालिबान यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. याबाबत तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन रॉ प्रमुख ए.एस.दुलत यांनी माय कंट्री, माय लाईप अँड काश्मीर द वाजपेयी इयर्स या पुस्तकातही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, कंदहार विमान अपहरणावेळी तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह मसूद आणि इतर दोन दहशतवादी उमर शेख आणि मुस्ताक जरगर यांच्यासमवेत कंदहारला गेले होते. देशातील 161 नागरिकांच्या सुटकेसाठी मसूद अजहरला सोडण्याचा निर्णय त्यावेळी भाजपा सराकारने घेतला होता.
दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांनी 36 दहशतवाद्यांची सुटका आणि 14 अब्ज डॉलर रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, अजित डोवाल आणि तत्कालीन रॉ प्रमुख सी डी सहाय व आयबीचे एन.एस. सिद्धू यांनी बोलणी केल्यानंतर यामध्ये मोठी तडजोड करण्यात आली होती.