नवी दिल्ली : हेरगिरी केल्याच्या कथित आरोपांवरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने पाकिस्तानसोबत मागच्या दरवाजाने चर्चा केली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्वत: पाकिस्तानी एनएसए नासीर खान जांजुआ यांच्याकडे शब्द टाकला होता. मात्र, यामध्ये यश आले नसल्याचा गौप्यस्फोट माजी सॉलिसिटर जनरल आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील वकील हरीश साळवे यांनी केला आहे.
शनिवारी साळवे हे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेने आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सला संबोधित करत होते. साळवे हे या परिषदेमध्ये ब्रिटनहून बोलत होते. यावेळी एका प्रश्नाला सालवे यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. ''आम्हाला वाटत होते की मागच्या दाराने चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना समजवू शकतो. आम्ही त्यांच्यासोबत माणुसकीच्या आधारावर सोडण्याची चर्चा करत होतो. मात्र तसे झाले नाही. त्यांनी कुलभूषण प्रकरण प्रतिष्ठेचे केल्याने अडथळा आला'', असे साळवे यांनी सांगितले.
पाकिस्तानने यावर अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. एफआयआरची आणि चार्जशीटची प्रतही अद्याप दिलेली नाही. अनेकदा विचारूनही त्यांनी काही पुरावेही दिलेले नाहीत. अशावेळी आम्ही हा विचार करत आहोत की पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जावे की नको, असेही साळवे म्हणाले.
कुलभूषण यांना मार्च २०१६मध्ये पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यांना २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी कुलभूषण यांना सुनावणीसाठी वकीलही देण्यात आला नव्हता. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने पाकिस्तानला फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानने यावर काहीही निर्णय घेतलेला नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप
CoronaVirus धक्कादायक! रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; आरोग्य कर्मचारी भावाच्या बाईकवर बसून पसार झाला
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले