अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; शरद पवार गटाकडून कॅव्हिएट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 06:17 AM2023-07-06T06:17:03+5:302023-07-06T06:17:18+5:30
राष्ट्रवादीतील वाद निवडणूक आयोगाकडे
- सुनिल चावके
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे तसेच सुमारे ४० आमदार, खासदारांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र असलेली याचिका बुधवारी अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली. शरद पवार गटाकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल करण्यात आले आहे.
१९६८ च्या निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ अंतर्गत अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला सुमारे ४० खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्यांची प्रतिज्ञापत्र असलेली ३० जून २०२३ तारखेची याचिका तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याच्या तारीख नसलेल्या प्रस्तावाची प्रतही ५ जुलैला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या इशारापत्राचा (कॅव्हिएट) ई-मेल ३ जुलैला आयोगाला प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीच्या विधानसभेतील ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सक्षम प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आल्याची सूचना देणारे जयंत पाटील यांचे ३ जुलैचे पत्रही आयोगाला प्राप्त झाले. निवडणूक आयोगाकडून याविषयी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यात येईल, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.
शरद पवार गटाची आज दिल्लीत बैठक
शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथे गुरुवारी बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्ह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात शरद पवार आणि अजित पवार गटाने एकमेकांवर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या दिल्लीतील केनिंग्ज लेन येथील कार्यालयाऐवजी ही बैठक दुपारी ३ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य या बैठकीत सहभागी होतील.