Praful Patel resigns: अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. २७ फेब्रुवारी २०२४ला राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदाच्या निवडणुकीसाठी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. ते याआधीच राज्यसभेचे सदस्य होते. मे २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. पण तांत्रिक कारण पुढे करून पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली.
अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, मला राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी अन्य कुणाला संधी मिळेल. त्यामुळे फार अफवा पसरवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायेत त्या आम्हाला वाटत नाही. अनेक गोष्टी भविष्यात समोर येतील. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले होते.
प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागी काय होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्या जागी पोटनिवडणूक लागेल. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची संमती घेतली आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करुन आमच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे, असेही नेते सुनील तटकरे म्हणाले. पक्षासमोर दहा जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. याबाबत पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बाजूचा विचार करुन पक्षाने हा निर्णय घेतला आहे, असेही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.