हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:21 PM2024-07-12T12:21:35+5:302024-07-12T12:25:07+5:30

NCP Ajit Pawar Group News: जम्मू-काश्मीरमधील निवडणुका लढवण्याची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ajit pawar ncp group likely to contest jammu and kashmir assembly election | हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात

हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात

NCP Ajit Pawar Group News: लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. बारामतीत एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून, यातून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता जम्मू काश्मीरमधील निवडणुका लढवण्याचा विचार अजित पवार गट करत आहे.

महाराष्ट्रासोबत जम्मू-काश्मीर येथेही निवडणुका होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. तेथील मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला जात आहे. याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुक लढवणार असून, त्यासंदर्भात तयारीला सुरुवात केली आहे. मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांना सक्रीय करणार असून पक्षाच्या योजना आणि जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत माहिती घेतली जाणार आहे, असे सांगितले जात आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तळागाळात कार्यकर्ते तयार होतील

तळागाळातील कार्यकर्त्यांना सशक्त करणे हा पक्षाचा उद्देश आहे. ब्रिजमोहन श्रीवास्तव वैयक्तिकरित्या जिल्हा अधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: बूथ प्रभारी यांच्याशी चर्चा करतील. या बैठकींमुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होईल, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते तयार होतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद संघटनेचा पाया मजबूत करतो, ज्यामुळे पक्षाची वाटचाल निवडणुकीत विजयाकडे होते, म्हणूनच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रसूल यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, आमचा पक्ष जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षाचा दृष्टिकोन स्पष्ट करण्याला जास्त महत्त्व देतो. जम्मू - काश्मीरमधील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथील खरी परिस्थिती जाणून घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचे भविष्य मजबूत करतील, असा विश्वास रसूल यांनी व्यक्त केला.
 

Web Title: ajit pawar ncp group likely to contest jammu and kashmir assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.