अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:57 AM2024-10-01T09:57:14+5:302024-10-01T09:58:50+5:30
राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाने घेतलेल्या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचे घड्याळ चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे कोर्टानं या खटल्यावर लवकर निर्णय द्यावा असा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टात १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर सुनावणी होत आहे. या सुनावणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह कायम राहणार की त्यांना नवीन चिन्ह मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
मागील सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून नवीन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही अटींवर घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून कोर्टाच्या निर्देशाचे पालन केले जात नाही. घड्याळ चिन्हाबाबत जनतेसमोर माहिती दिली जात नाही असा आक्षेप शरद पवार गटाकडून घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत अद्याप सुप्रीम कोर्टात खटला न्यायप्रविष्ट आहे.
आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह द्यावं, घड्याळ चिन्हाचा वापर करू देऊ नये अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. परंतु कागदपत्रे उशिरा मिळाल्याचं कारण सांगत अजित पवारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला होता. या खटल्यावर १२ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार होती. परंतु महाराष्ट्रात निवडणूक होणार आहेत. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे या खटल्यावर लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी शरद पवार गटाने केली त्यानुसार आज १ ऑक्टोबरला या खटल्यावर सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यावेळी ४० हून अधिक आमदार अजितदादांसोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ चिन्ह यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या निवडणूक आयोगापुढे संघर्ष सुरू झाला. त्यात अजित पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाकडून बहाल करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तेव्हापासून हा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह घेण्याचा सल्ला दिला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हाबाबत वाद न्यायप्रविष्ट आहे अशा सूचना पोस्टर, बॅनर्सवर लिहायला सांगितल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने तुतारी या नव्या चिन्हावर ८ खासदार निवडून आणले तर अजित पवारांच्या पक्षाचे केवळ १ खासदार निवडून आले. घड्याळ चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत बहुतांश मतदारांचा गोंधळ झाला असं शरद पवार गटाने आरोप केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह मिळावं अशी मागणी सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.