लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादांच्या नाराजीचा मुद्दा फेटाळून लावला.
अजित पवार आणि जयंत पाटील हे खुश नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच जबाबदाऱ्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कोणतीही पक्षांतर्गत जबाबदारी नव्हती. पक्षकार्यासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी होती. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे नाव एक महिन्यापासून सुचवले होते. त्यावर आज निर्णय घेण्यात आला. अन्य राज्यांमध्ये पक्षकार्य वाढविण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याची गरज होती. त्यासाठी एक नव्हे तर दोन कार्याध्यक्ष नेमून त्यांना प्रत्येकी चार ते पाच राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे पवार यांनी ६, जनपथ येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पक्षाध्यक्षपद रिक्त नाही...
सोळा वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे लोकसभेत अनुभवी नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. दिल्लीपासून पंजाब आणि हरयाणा जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे ही राज्ये देण्यात आली आहेत. प्रफुल्ल पटेल जिथे राहतात त्या गोंदियापासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे ही राज्ये त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. भविष्यात पटेल किंवा सुळे यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार असे विचारले असता सध्या आपणच अध्यक्ष असून, ती जागा रिक्त नाही, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केली.
विरोधी ऐक्यासाठी काम करणार
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. पाटणा येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणकोणते पक्ष येतात हे दिसेलच, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लोक भाजपला धडा शिकवतील
महाराष्ट्रात भाजप नसलेल्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरत असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीने वक्तव्ये करीत आहे. असे तीन-चार ठिकाणी घडले आहे. पण, अंतिमतः महाराष्ट्राची जनता या लोकांना धडा शिकवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.