Ajit Pawar Amit Shah Meeting ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशिरा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं जागावाटप आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी, याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. लोकसभेतील कामगिरी विधानसभेतही कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे, लोकसभेत बसलेल्या फटक्याची विधानसभेत पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. यादृष्टीनेच भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळावं, यासाठी दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे इथं भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळीही अजित पवारांनी पुण्यातील हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा एकदा शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याने महायुतीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करून सरकारच्या कामाची गती वाढवायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली. मात्र निवडणूक निकालाला दोन महिने होत आले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही काल अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अमित शाह-अजित पवारांची पुण्यात भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २० आणि २१ जुलै रोजी निमित्ताने पुण्यात होते. यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली होती. शरद पवार यांना शह देण्यासंदर्भात मुख्यत्वे चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. शाह यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या वीसेक ज्येष्ठ नेते, आमदारांशी चर्चा केली होती.