गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अजित पवारांची ५० मिनिटे चर्चा; दिल्लीत काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:01 AM2023-07-13T07:01:50+5:302023-07-13T07:02:42+5:30
खातेवाटपाचा तिढा दिल्लीत, ‘अर्थ’वरून राज्यात तर्कवितर्क, पवार म्हणाले... ही केवळ चर्चाच
मुंबई/नवी दिल्ली : राज्यातील खातेवाटप आणि विस्तार रखडलेला असताना आणि त्याबद्दलचे वेगवेगळे आडाखे बांधले जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय खलबते झाली, यासंबंधी पवारांनी काहीही सांगितले नाही, मात्र अजित पवार यांना अर्थखाते मिळून खातेवाटपाचा तिढा सुटणार काय? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
५० मिनिटांच्या या भेटीत सोबत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलही होते. अजित पवार यांनाच अर्थ खाते मिळणार, असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून या बैठकीपूर्वी देण्यात आले. परंतु, ही केवळ चर्चाच असल्याचे अजित पवार यांचे म्हणणे आहे. अजित पवार गटातील एका मंत्र्याने सांगितले की, शपथविधीपूर्वी ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्यानुसार काही महत्त्वाची खाती आम्हाला मिळणार होती. त्यात अर्थखात्याचाही समावेश होता. सूत्रांनी सांगितले की, अर्थखात्यासह गृह, जलसंपदा अशी महत्त्वाची खाती अजित पवार गटाला दिली जात नसल्याने नऊ मंत्र्यांचे खातेवाटप रखडले आहे.
मंत्रिमंडळ बैठक नाही
अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर ४ जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवार गटाचे नऊ मंत्री बिनखात्याचे बसले होते. या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली असती तर या मंत्र्यांना पुन्हा बिनाखात्याचे बसावे लागले असते. खातेवाटप झाले नसल्याने दर आठवड्याला मंगळवारी किंवा बुधवारी होणारी मंत्रिमंडळ बैठकच घेण्यात आली नाही.
अर्थखाते अजित पवार यांना मिळू नये, याला शिवसेनेचा विरोध ही अफवा आहे. आम्ही सगळ्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. काही बाबतीत उशीर होऊ शकतो, पण कोणताही समज-गैरसमज नाही. मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री, खातेवाटप याबाबतचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला आपल्याला दिसेल. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
दिल्लीत काय घडले?
आज सायंकाळी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ दिल्लीत दाखल झाले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच दिल्लीत दाखल झाले. अमित शहा यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि पटेलच गेले. त्यांच्यासोबत मुश्रीफ नव्हते. मात्र, मुंबईला परत जाताना अजित पवार यांच्या सोबत हसन मुश्रीफ होते. हसन मुश्रीफ आपल्या वैयक्तिक कामासाठी आमच्यासोबत दिल्लीत आले. ते आमच्यासोबत कुठेही येणार नाहीत, असे पटेल यांनी स्पष्ट केले. मधल्या काळात मुश्रीफ कुठे गेले याची चर्चा होती.
अजित पवार काय म्हणाले..?
खातेवाटपाचा प्रश्न मुंबईतच सुटला असून आमच्यात कुठलाही वाद नाही. आम्ही कुठलाही मुद्दा घेऊन आलेलो नाही. केवळ सदिच्छा आणि शिष्टाचार भेट तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अमित शाह यांच्याशी पहिली औपचारिक भेट म्हणून दिल्लीत आलो. १८ जुलैला होणाऱ्या रालोआच्या बैठकीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ - अजित पवार
राष्ट्रवादीच्या दहा प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज पक्षाच्या दहा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली, बिहार, गोवा, छत्तीसगड, पंजाब, पश्चिम बंगाल, हरयाणा, मणिपूर, राजस्थान व अंदमान निकोबार या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पदमुक्त केले व प्रदेश कार्यकारिण्याही भंग केल्या. लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिण्या नेमल्या जातील, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.