ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 5 - बीफ बंदी आणि ट्रीपल तलाक प्रथा संपवण्याचे समर्थन करणारे अजमेर दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुअल अबेदीन अली खान यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. सय्यद यांचा भाऊ अलाउद्दीन अलीमी यांनी जैनुअल यांना पदावरुन हटवण्यात येत असल्याचे जाहीर केले. यापुढे अजमेर दर्ग्याचे नवीन दिवाण म्हणून अलाउद्दीन यांनी स्वत:च्या नावाची घोषणा केली आहे.
अजमेर दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुअल अबेदीन अली खान यांनी सांगितले की, 12 व्या शतकातील या दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या 805व्या उरूस समारोप कार्यक्रमानिमित्त गोमांस बंदीची मागणी करण्यात आली होती. कोट्यवधी मुस्लिमांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि देशभरात गोमांसवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मंजूर करावे, असेही त्यांनी म्हटले होते.
"हिंदू गाईला आई मानतात आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या भावनांचा सन्मान करणं हे इस्लामच्या मूळ सिद्धांतापैकी एक आहे", असे अजमेर दर्ग्याचे दिवाण म्हणाले. तसंच "जोपर्यंत आमची गोमांस बंदीची मागणी मान्य नाही होत, तोपर्यंत आमच्या भूमिकेच्या बाजूनं उभं राहावं", असं आवाहनही त्यांनी हिदूंना केले आहे.
काय म्हणाले होते जैनुअल
- मुस्लिमांनी गोवंशाच्या प्राण्यांची कत्तल करु नये तसेच बीफ खाऊ नये त्यामुळे देशात चांगला आणि सकारात्मक संदेश जाईल.
- सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावे, गाय हे धार्मिक विश्वासाचे चिन्ह आहे. फक्त सरकारच नव्हे तर, गायीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
- बीफ हे जातीय तणावाचे कारण ठरते त्यामुळे सरकारने बीफ बंदीबरोबर कत्तलखाने बंद करावेत असे विधान जैनुअल यांनी केले होते. समाजिक शांततेसाठी मुस्लिमांनी बीफ पासून दूर रहावे.
- पत्नीपासून विभक्त होण्यासाठी ट्रीपल तलाकची प्रथा ही शरीया कायद्यानुसार नाही.
- गोवंश हत्येसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करणारा कायदा करणा-या गुजरात सरकारचे जैनुअल यांनी समर्थन केले होते.