अजमेर – राजस्थानच्या अजमेर येथे आनासागर तलावात कोणीतरी नोटांनी भरलेली बॅग फेकली होती. रविवारी संध्याकाळी अचानक याठिकाणी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा पाण्यावर तरंगताना दिसत होत्या. ही माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी या तलावानजीक गर्दी केली. इतकचं नाही तर लोकांनी तलावाच्या पाण्यात उड्या मारून नोटा जमा करण्यास सुरूवातही केली.
स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा महापालिकेचे कर्मचारीही बोट घेऊन तलावात उतरले आणि नोटा जमा करू लागले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. लोकांनी तलावाच्या ठिकाणी गर्दी केली असता पोलीस पथक येथे आले आणि त्यांनी लोकांना तिथून हटवले.
२०० आणि ५०० रुपयांच्या नोटा तलावात पडलेल्याच्या प्रकारावर स्थानिक मोहम्मद उस्मान यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी काही नोटा तरंगताना दिसत होत्या. त्यानंतर काही लोक तलावाच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी नोटा जमा करण्यास सुरूवात केली. मला स्वत:ला यावेळी जवळपास २५०० रुपये मिळाले. तर इतरांनाही हजारो रुपये मिळाले होते. जेव्हा ही बातमी शहरात पसरली तेव्हा अनेकांनी तलावाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली. काही विचार न करता लोकांनी तलावात उड्या मारायला सुरुवात केली.
नव्या नोटा सापडल्याने खळबळ
आनासागर तलावात २०० आणि ५०० च्या नव्या नोटा आढळल्या. पोलिसांच्या अंदाजानुसार कोणत्या तरी व्यक्तीचं पाकीट तलावात पडलं असावं त्यातील नोटा बाहेर आल्या असतील. पंरतु काही लोक तलावात नोटांनी भरलेल्या बॅगा फेकल्याचं सांगत होते.
पालिकेचे कर्मचारी पोहचले परंतु...
आनासागर तलावात नोटा तरंगतानाची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. तलावातील जलपर्णी काढण्याचं काम कर्मचाऱ्यांनी केले. इतकचं नाही तर कर्मचाऱ्यांनाही काही नोटा सापडल्या. याठिकाणी काही लोकांनी नोटा काढल्या आणि फरार झाले. मात्र तलावात इतक्या नोटा कशा आल्या याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पण ज्यांना तलावातील नोटा सापडल्या त्यांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.