नवी दिल्ली -काँग्रेसनेते तथा माजी खासदार राहुल गांधी यांनी पक्ष सोडलेल्या आणि पक्ष सोडून भाजपत गेलेल्या नेत्यांच्या नावांसंदर्भात एक ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची नावे अशा प्रकारे लिहिली आहेत की त्याचे 'अदानी' होते. त्यांच्या याच ट्विटवरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी ट्विट करत राहुल यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, अनिल यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अनिल अँटोनी म्हणाले, एका राष्ट्रीय पक्षाचे माजी अध्यक्ष आणि तथाकथित पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला पाहून वाईट वाटते. ते एखाद्या राष्ट्रीय अथवा वरिष्ठ नेत्यांप्रमाणे बोलत नाहीत. ते एखाद्या ऑनलाईन/सोशल मिडिया सेल ट्रोल प्रमाणे बोलत आहेत. मला हे पाहून आनंद वाटला की, माझे नाव राष्ट्र निर्माणाच्या कामात अनेर दशके योगदान देणाऱ्या या बड्या दिग्गजांसोबत जोडले गेले. एवढेच नाही तर, आपल्याला पक्ष सोडावा लागला, कारण आपल्याला एका कुटुंबासाठी नव्हे, तर भारत आणि आपल्या लोकांसाठी काम करायला आवडते, असेही अनिल यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच खांद्यावर घेतलाय भाजपचा झेंडा -अनिल अँटोनी यांनी 6 एप्रिल रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाकडे, केरळमधील भाजपच्या मोठा नैतिक विजयाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनिल अँटोनी म्हणाले होते, काँग्रेसने आता केवळ दोन-तीन लोकांच्याच हिताला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक निर्णय आहे. मी विचारांमध्ये अंतर जाणवत असल्याने काँग्रेस पक्ष सोडला आहे.