2024 च्या निवडणुकीत मोदींना हरवण्याठी अँटोनींचा काँग्रेसला मोठा 'गुरूमंत्र'; भाजप नेत्यानं केला जोरदार पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:23 PM2022-12-29T13:23:35+5:302022-12-29T13:28:22+5:30
अँटोनी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते...
हिंदू व्होट बँकेचे महत्त्व सांगताना काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटोनी यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी बहुसंख्य समाजालाही सोबत घ्यायला हवे. केवळ अल्पसंख्यकांच्या बळावर ही लढाई जिंकता येणार नाही, असे अँटोनी यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. याच बरोबर, काँग्रेसने हिंदूंबाबत अधिक संवेदनशील राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अंटोनी म्हणाले, 'भारताच बहुसंख्यक लोक हिंदू आहेत आणि या बहुसंख्यक समुदायाला नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईत सहभागी करायला हवे. त्यामुळे सर्वांनीच सतर्क रहायला हवे. 'फॅसिझमविरुद्धच्या लढाईत' बहुसंख्य समाजाला सोबत घ्यायला हवे."
हिंदूंना सॉफ्ट हिंदुत्वाच्या स्वरुपात दाखवणे अयोग्य -
अँटोनी म्हणाले, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे, अगदी त्याच पद्धतीने हिंदू समाजातील लोकांनाही मंदिरात जाण्याचे आणि गंध लावण्याचा अधिकार आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाजाचे लोक असे करतात, तेव्हा-तेव्हा त्यांना सॉफ्ट हिंदुत्व मानणाऱ्या लोकांच्या स्वरुपात दाखवले जाते. ही रणनीती योग्य नाही. यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षालाच फायदा होईल आणि तो पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येईल.
भाजपचा पलटवार -
अँटोनी यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनाता पक्षाकडून पलटवार करण्यात आला आहे. यावर बोलताना शहजाद पुनावाला म्हणाले, खरे तर ‘हिंदू को दो गाली, ताकि मिले वोट बैंक की ताली’ अशी काँग्रेसची भूमिका राहिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने अनेक वेळा प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला. काँग्रेसनेने गीतेची तुलना जिहादसोबत केली. एवढेच नाही,तर हिदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरम या दहशतवादी संघटनांसोबत केली होती. काँग्रेसने व्होट बँकेसाठी सर्वप्रथम हिंदुत्वाचा संबंध दहशतवादाशी जोडला आणि आता त्यांच्याच एका ज्येष्ठ नेत्याने त्यांचे म्हणणे फेटाळले आहे."