विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कृषी कायद्याला एक वर्ष झाल्याच्या निषेधार्थ अकाली दलाने शुक्रवारी दिल्लीत ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट मार्च’ काढला. पोलिसांनी मात्र परवानगी नाकारल्याने रस्ते जाम झाले. यावेळी सुखबीर सिंग बादल यांनी अटक करून घेतली.
दिल्लीत पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी केला असून, सकाळी आठपासूनच रस्ते जाम होते. शेतकरी व कार्यकर्ते दिल्लीत येत असताना झाडोदा कला सीमा बंद करण्यात आली, तर पंडित श्री राम मेट्रो स्टेशन आणि बहादूरगड सिटी मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले.
‘ब्लॅक फ्रायडे’ निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्या अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सीमेवरच थांबविले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रकाबगंज गुरुद्वारापासून निदर्शने सुरू केली होती. कृषी कायदा रद्द करण्याची मागणी अकाली दलाने केली आहे. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
भाजप, आप, कॉँग्रेसवर आरोप
पंजाबमध्ये निवडणुका आहेत. तिथे अकाली दलाची सध्याची स्थिती दयनीय असल्याने अकाली दलाचे आजचे आंदोलन असल्याची टीका कॉँग्रेसने केली, तर दुसरीकडे अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबमध्ये आमचे सरकार आल्यास आम्ही कृषी कायदे लागू होऊ देणार नाही अशी घोषणा केली.
आमची लढाई सुरूच -हरसिमरत कौर बादल
- मोदी सरकार कृषी कायदे मागे घ्यायला तयार नाही. हे कायदे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्यानेच मी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
- गेल्या नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अकाली दल कायम शेतकऱ्यांसोबत असून, आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ असे यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.