संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘अब की बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार,’ ही घोषणा देत भाजपने सर्व राज्यांतील पक्ष नेत्यांना १०० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले आहे. ज्या राज्यात पक्षाची ताकद कमी आहे तिथे युती करण्याची शक्यता तपासून पाहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये अकाली दल आणि तेलुगू देसम पक्षासोबत युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
४०० जागा जिंकण्यासाठी भाजपच्या संपूर्ण संघटनेला प्रत्येक लोकसभा जागेवर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः प्रत्येक राज्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजस्थानातील लोकसभेच्या सर्व २५ जागा पुन्हा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सर्व राज्यांतील लोकसभेच्या सर्व जागांवर मंथन सुरू झाले आहे. प्रत्येक जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. भाजपचे अध्यक्ष नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, चार राष्ट्रीय सरचिटणीस हे एका-एका राज्याचा दौरा करत आहेत. लोकसभेच्या तीन ते चार जागांसाठी तयार झालेल्या गटाचे दौरेही लवकरच सुरू होतील.
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात
पंजाबमध्ये राज्यातील भाजप नेते शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. भाजपला पाच ते सहा जागा लढवायच्या आहेत; पण अकाली दल भाजपला फक्त तीन ते चार जागा देण्यास इच्छुक आहे. पटियाला, अमृतसर, गुरदासपूर आणि फरीदकोट या जागांवर भाजप दावा करत आहे. आंध्र प्रदेशमध्येही तेलुगू देसम पक्षासोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
नव्या मतदारांसाठी संमेलन
सर्व राज्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदार संमेलन आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. या निमित्ताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे.