संजय शर्मानवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी करीत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला शिरोमणी अकाली दल आणि तेलुगू देसम पक्षाकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेत जागावाटपाची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीतील हॉटेल अशोका येथे एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीत ३८ राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, एनडीएच्या बैठकीत जागावाटपावर कोणतीही चर्चा होणार नाही. भाजपच्या राज्य शाखा जागावाटपासाठी मित्रपक्षांशी चर्चा करतील.
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने लोकसभेच्या ११ पैकी सात जागा मागितल्या आहेत. तर, भाजपसाठी चार जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपने अकाली दलाला अर्ध्या - अर्ध्या जागांवर निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. म्हणजेच भाजप पाच ते सहा जागांची मागणी करीत आहे. त्या बदल्यात विधानसभेत अकाली दलाला ११७ पैकी ६० जागा देण्यास तयार आहे. जागांच्या मुद्द्यावरून अकाली दलाने नाराजी दर्शवत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
भाजपला आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षासोबत युती करायची आहे. पण, तेलंगणात भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांना असे वाटते की, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपकडून जागावाटप व्हावे. तेलंगणात स्वबळावर लढण्याच्या भाजपच्या आग्रहामुळे आंध्र प्रदेशात भाजपची टीडीपीसोबतची युती होऊ शकलेली नाही. मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत टीडीपीच्या सहभागावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्राबाबू नायडू, अकाली दलाचे नेते सुखबीर बादल कौर, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्याशी एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्याबाबत चर्चा करत आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात भक्कम जनाधार असलेले राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्याशी सुरू असलेली चर्चाही जागांवर अडकली आहे. जयंत चौधरी पश्चिम उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा मागत आहेत. त्यापैकी बागपत आणि मुझफ्फरनगर प्रमुख आहेत. या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात आहेत.
महाराष्ट्रातून कोण होणार सहभागी? महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (रामदास आठवले गट) एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातही अद्याप जागावाटप ठरलेले नाही. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागांबाबत लवकरच चर्चा होईल.