Akbar Sita Lions Row : (Marathi News) पश्चिम बंगाल प्राणीसंग्रहालयात अकबर नावाचा सिंह आणि सीता नावाच्या सिंहिणीच्या वादानंतर आता त्रिपुरा सरकारने राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित केले.
दरम्यान, प्राण्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 फेब्रुवारीला त्रिपुराच्या सिपाहिजाला प्राणीसंग्रहालयातून सिलीगुडी येथील उत्तर बंगाल वन्य प्राणी उद्यानात सिंह आणि सिंहिणीला स्थलांतरित करण्यात आले. मात्र, सिलीगुडीला पाठवताना या सिंह आणि सिंहिणीला अकबर आणि सीता अशी नावे डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंदवली. या नावांवरून वाद सुरू झाला. या नावांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) कोलकाता उच्च न्यायालयात केलेल्या तक्रारीनंतर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांचे हे निलंबन करण्यात आले आहे.
प्रवीण लाल अग्रवाल, 1994 च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. ते त्रिपुराचे मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. सिलीगुडीला पाठवताना त्यांनी अकबर आणि सीता या सिंह जोडप्यांची नावे डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंदवली. मात्र यावरुन वाद निर्माण झाला. यानंचर 21 फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी सर्किट बेंचमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल युनिटने एक जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिंह आणि सिंहिणीला दिलेली अकबर आणि सीता ही नावे बदलण्याचे आदेश दिले होते.