ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १० - अकबर हे महान राजा नसून ते तर बाहेरुन आलेले राजा होते असे विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी केले आहे. देशभरातील शाळांमध्ये शिकवल्या जाणा-या इतिहासात आपण मुलांना परदेशातून आलेल्या राजांचीच माहिती देतो. याऐवजी आपण महाराणा प्रताप, आर्यभट्ट या सारख्या भारतीयांची माहिती द्यायला हवी असे देवनानी यांनी म्हटले आहे.
राजस्थानमधील शाळांमधील पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना केली जाणार असून यात आता जास्तीत जास्त भारतीय राजा, संशोधक, वैज्ञानिक, गणिततज्ज्ञ यांचा समावेश केला जाणार आहे. यावरुन वाद निर्माण झाला असून याविषयी राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये देवनानी यांनी अकबर हे महान राजे नव्हते, ते तर परप्रांतातून आलेले होते असे म्हटले आहे. अशा परदेशातून आलेल्यांमुळेच देशात स्वातंत्र्य चळववळ झाली असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. अकबर पेक्षा महाराणा प्रताप थोर होते. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबर, न्यूटन यासारख्या व्यक्तींवर एक धडा आहे. पण महाराणा प्रताप किंवा आर्यभट्ट यांच्यावर आधारित एकही धडा नाही असा दावाही त्यांनी केला. परदेशातील थोर राजे व संशोधकांसोबतच भारतातील थोर राजे, संशोधक, वैज्ञानिक यांचीही माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी असे त्यांनी नमूद केले. राजस्थानमधील शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून यावरुनही देवनानी यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.