हैदराबाद – एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा छोटा भाऊ आणि एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी समर्थकांना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे.
अकबरुद्दीन ओवैसी चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 2011 मध्ये एका घटनेत अकबरुद्दीन यांच्यावर गोळीबारी करण्यात आली होती. तसेच चाकूने केलेल्या वारमुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्याचा त्रास त्यांना अनेकदा होत असे. तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी उलटी होऊन पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याचा उपचार करण्यासाठी ते लंडनसाठी रवाना झाले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही ट्विट करुन अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ईदनिमित्त संबोधित करताना सांगितले की, तुम्ही सगळ्यांनी अकबरुद्दीनच्या प्रकृतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करा. मी सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही अकबरुद्दीनच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. अल्लाह त्यांची प्रकृती सुधारेल अशी आशा व्यक्त केली.