हरिद्वार :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षांमध्येच स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण हाेईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.हरिद्वार येथील कनखल येथे श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व गुरुत्रय मंदिराच्या लाेकार्पण साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते.
एका कार्यक्रमात बाेलताना त्यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे. मात्र, आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिल्यास १० ते १५ वर्षांमध्येच भारत अखंड हाेईल. भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यात जे आडवे येतील ते नष्ट हाेतील.
भारताच्या प्रगतीच्या प्रवासात सर्वांनी साेबत यावे, थांबविण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्यांना साेबत यायचे नाही, त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे भागवत यांनी परखडपणे सांगितले.
गेल्या वर्षीही भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अखंड भारताबाबत मत मांडले हाेते. भारतापासून वेगळे झालेले पाकिस्तानसारखे राष्ट्र संकटात आहे. अखंड भारत हा शक्ती नव्हे तर हिंदू धर्माच्या माध्यमातूनच निर्माण हाेऊ शकताे, असे ते म्हणाले हाेते.
हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म- माेहन भागवत म्हणाले की, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. हजार वर्षांपर्यंत सनातन धर्माला समाप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. - मात्र, ते संपले. आपण व सनातन धर्म आजही तिथेच आहे.
अहिंसेचा पुरस्कार मात्र हातात दंडुके घेऊनच- आम्ही अहिंसेचा पुरस्कार करताे. आमच्या मनात द्वेष नाही.- मात्र, जग शक्तीलाच मानते. त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार हातात दंडुके घेऊनच हाेईल, असे माेहन भागवत म्हणाले.