नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद केवळ महाराष्ट्रात नाही, तर आता देशभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. यातच आता अखिल भारतीय हिंदू महासभेने सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये लाउडस्पीकरवरून दिल्या जाणाऱ्या अजानबाबत सुमोटो दखल घ्यावी, असे म्हटले आहे.
धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले लाउडस्पीकर हटवण्यात यावेत, अशी विनंती हिंदू महासभेने सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. तसेच लाउडस्पीकरवरून दिल्या जाणाऱ्या अजानबाबत खल घ्यावी व अशाप्रकारे अजान देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी या पत्र याचिकेत करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना दिलेल्या पत्र याचिकेत अनेक तर्क मांडण्यात आले आहेत.
सामुदायिक बैठकीची ठिकाणे म्हणून घोषित केली जावीत
मशीद, ईदगाह आणि दर्गा ही प्रार्थनास्थळे नाहीत तर सार्वजनिक संमेलन आणि बैठकांची ठिकाणे आहेत. त्यामुळेच ही स्थळे सामुदायिक बैठकीची ठिकाणे म्हणून घोषित केली जावीत. इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि कुराण रचले गेले तेव्हा लाउडस्पीकर नव्हते. त्यानंतर इस्लाम धर्माच्या प्रसारातही लाउडस्पीकर कुठेही नव्हता. म्हणजे लाउडस्पीकरचा आणि इस्लामचा दुरान्वये संबंध नाही, असे या पत्रात म्हटले आहे. सर्वच धार्मिक स्थळांवर फक्त सणादिवशी लाउडस्पीकरला अनुमती असावी. इतरदिवशी त्यास मनाई असावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या याचिकेवर अद्याप सुनावणी निश्चित करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांचा वाद पेटला आहे. हे भोंगे हटवण्याची मागणी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात हा मुद्दा सध्या सर्वाधिक गाजत असून राजकारणही चांगलेच तापले आहे. तसेच संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकार समतोल भूमिका घेऊन हा विषय हाताळत आहे. या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे नियोजनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.