नवी दिल्ली - देशाच्या राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी पंतप्रधानांचं स्वागत केले. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानीत मराठीचा डंका वाजत आहे. शुक्रवारी सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यावेळी महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक आणि रसिक उत्साहाने सहभागी झाले. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काश्मीरी तरूणीने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं.
कोण आहे काश्मीरी तरूणी?
सरहद संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात काश्मीरच्या बांदिपुरा भागातील तरूणी शमीमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही या तरूणीने गायलेले लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी हे गाणे चांगलेच चर्चेत आले होते. शमीमा अख्तर पहिल्यांदाच समोर आली आहे असं नाही तर विठ्ठलभक्तीची गाणी, अभंग हेदेखील ती तिच्या सुरेल आवाजात गात असते.
शमीमा अख्तर ही मूळची काश्मीरची, काश्मीरच्या बांदिपुरा भागात ती लहानाची मोठी झाली. तिचं बालपण हे दहशतीच्या सावटाखालीच गेले. एका दहशतवादी हल्ल्यात तिच्या आईला गोळी लागली. लहान असलेल्या शमीमाला आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची पुसटची कल्पनाही नव्हती. याच दहशतीत ती लहानाची मोठी झाली. आता हीच शमीमा धर्म, जात, पंत या पलीकडे जात आपल्या आवाजाने शांततेचा आणि एकतेचा संदेश देते.
शमीमाला घरातूनच संगीताचा वारसा लाभला. तिचे आजोबा प्रसिद्ध कव्वाली गायक होते. त्यामुळे संगीताचे सूर सतत तिच्या कानावर यायचे. आजोबाची कव्वाली ऐकत ती मोठी झाली. बालपणापासून गाण्याचा छंद लाभलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला. त्यानंतर लखनौ विद्यापीठातून तिने संगीतात पदवीही घेतली. कालांतराने शमीमा पुण्यात आली आणि तिथेच तिने मराठी गाणी आत्मसात करण्यास सुरुवात केली. वारीच्या काळात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात असताना शमीमानं गायलेली मराठी गाणी कानावर पडली. तिने गायलेली विठ्ठलाची गाणी, अभंग याचे सूर लोकांना आवडले. काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी. आई, वडील आणि पाच बहिणी हे तिचं कुटुंब. काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिला पुण्यात आणले. तिच्या मधुर आवाजातून सर्वप्रथम सूर गुंजले ते ‘पसायदाना’चे! आता याच तरूणीने मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले.