लखनौ - धर्म विचारल्यामुळे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुझफ्फरनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष योगेंद्र वर्मा यांना मारहाण करण्यात आली आहे.
योगेंद्र वर्मा त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत बाहेर जात असताना हा प्रकार घडला. मुझफ्फनगरमधील शेरेनगर भागात एक तरुण मुलीला जबरदस्तीने बाईकवरून घेऊन जात असल्याचं त्यांनी पाहीलं. त्यांना थोडा संशय आला त्यामुळेच त्यांनी तरुणाची याबाबत चौकशी केली. त्याचवेळी दोघांचे धर्म वेगळे असल्याची त्यांना शंका आली. म्हणून त्यांनी तरुणाला त्याचा धर्म विचारला. चौकशी करताच तरुणाने तेथून पळ काढला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कारखान्यातून काही लोकांना बोलावून वर्मा यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच वर्मा यांच्यासोबत असलेल्या महिलेलाही धक्काबुक्की करण्यात आली.
योगेंद्र वर्मा यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र हा सर्व प्रकार पाहिल्यावर घाबरलेली तरुणी तेथून पसार झाली. मुझफ्फरनगर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. सऊद, उस्मान, इरशाद आणि साजिद अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं असून हे सर्व आरोपी शेरनगरचे रहिवासी आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या वडिलांनी मुलावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मुलाला मुद्दाम यामध्ये अडकवण्यात आल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.