विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:42 AM2019-05-14T10:42:51+5:302019-05-14T10:45:37+5:30

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.

Akhilesh and Mayawati will remain absent in the meeting of opposition parties | विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

googlenewsNext

लखनौ - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 19 मे रोजी होणारे शेवटच्या फेरीतील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. 

दरम्यान, सर्व नेत्यांची उपस्थिती निश्चित झाल्यानंतर ही बैठक 21 मे रोजी आयोजित होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशीसुद्धा यादंर्भात चर्चा केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. 
  दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावत आणि अखिलेश यादव यांनीही निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी बोलावलेल्या अशा कुठल्याही बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच या बैठकीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे समाजवादी पक्षाचे मत आहे. असे पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत अखिलेश यादव सहभागी होणार नाहीत. 


  तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतात, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत अशा बैठकीला काही अर्थ नसेल. असे बहुजन समाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. एकीकडे चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निकालांनंतर केंद्रात बिगर काँग्रेस बिगर भाजपा आघाडी बनवण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. 

 दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी स्टॅलिन यांची मदत मागितली. मात्र काँग्रेसला वगळून अशी आघाडी बनवणे व्यर्थ असल्याचे स्टॅलिन यांनी चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे वृत्त आहे.  

Web Title: Akhilesh and Mayawati will remain absent in the meeting of opposition parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.