हरिश गुप्ता/सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- मुख्यमंत्री अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखालील गटच खरा समाजवादी पक्ष असून, पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘सायकल’ वापरण्याचा अधिकारही याच गटाला आहे, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी दिला. त्यामुळे ‘सायकल’साठी सुरू असलेली समाजवादी पक्षाच्या दोन गटांतील झुंज संपली. दुसरीकडे मुलायमसिंग यांनी लोक दलाकडे असलेले ‘शेत नांगरणारा शेतकरी’ हे चिन्ह मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयानंतर उत्तर प्रदेशात अखिलेश गटाबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेसने लगेच तयारी सुरू केली असून, लालुप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेस, अपना दलही या महाआघाडीत सहभागी होईल, असे दिसत आहे. अखिलेश गटाची बाजू सर्वत्र ठामपणे मांडणारे त्यांचे काका रामगोपाल यादव यांनी आम्ही काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करणार आहोत, असे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आम्ही अखिलेश यांच्या धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. तृणमूल काँग्रेस व अपना दलाचा एक गटही आमच्याबरोबर आहे, असे यादव म्हणाले. लालुप्रसाद यांनी अखिलेश यांना थेटच पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दलास (संयुक्त) महाआघाडीत बोलावल्यास त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात फार तर ५ ते १0 जागा लढवेल. आयोगाच्या निकालानंतर अखिलेश लगेचच मुलायमसिंग यादव यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, असे मुलायमसिंग यांनी जाहीर केले. म्हणजेच दोघांची भेट केवळ उपचार होती. सायकलवर हक्क सांगण्यासाठी आणि आपल्याच गटाला मान्यता मिळावी, यासाठी मुलायमसिंग व अखिलेश यांनी आयोगापुढे याचिका दाखल केल्या होत्या. शुक्रवारी त्यांचे युक्तिवाद आयोगाने ऐकले होते. उत्तर प्रदेशात मंगळपारपासून पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने त्याआधी आयोगाने निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर मुलायम व अखिलेश गट एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार, हे स्पष्ट झाले.>अखिलेश गटाची निवडणुकीची तयारी पूर्णअखिलेश यांची लोकप्रियता व काँग्रेसशी आघाडी, यामुळे अखिलेशची धर्मनिरपेक्ष प्रतिमा मजबूत होईल आणि जागाही वाढतील, असा त्या गटाचा दावा आहे. अखिलेश गटाचा जाहीरनामा, झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स ही तयारी पूर्ण आहे. पोस्टर्स बॅनर्सवर अखिलेश सोबत यंदा डिंपल यादवांचे छायाचित्र आहे. सायकल हे निवडणूक चिन्ह छापणे बाकी होते. सारी सामुग्री दोन दिवसांत सर्वत्र पोहोचेल.अखिलेश लखनौमध्ये अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करतील. अखिलेश गटाच्या प्रचारमोहिमेचा प्रारंभ १९ जानेवारीला आग्य्रापासून सुरू होणार आहे. >अखिलेशकडे तगडे पाठबळसपात अखिलेशच्या बाजूने असलेले व आयोगाने सप्रमाण मान्य केलेले तगडे संख्याबळ >विधानसभा सदस्य २२८ पैकी २०५>विधान परिषद सदस्य६८ पैकी ५६> लोकसभा व राज्यसभासदस्य २४ पैकी १५>राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ४६ पैकी २८>राष्ट्रीय अधिवेशन प्रतिनिधी: ५,७३१ पैकी ४,४००>एकूण पक्ष प्रतिनिधी५,७३१ पैकी ४,७१६