नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपात गुरुवारी नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. अखिलेश यादव यांनी गुजरातच्या गाढवांबाबत केलेल्या वक्तव्यावर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अखिलेश यांनी माझ्यावर किंवा भाजपावर टीका केली असती तर मी समजू शकलो असतो. पण, त्यांनी तर येथून हजारो किमी दूर असणाऱ्या थेट गुजरातच्या गाढवांना लक्ष्य केले. गाढवांबाबतच्या भीतीचे कारण काय? गाढवं मालकाशी निष्ठावान असतात. याच प्राण्यापासून पे्ररणा घेऊन आपण देशातील जनतेसाठी काम करत आहोत. पण, अखिलेश यांना तर आता गुजरातच्या गाढवांचीही भीती वाटू लागली आहे. अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करताना अमिताभ बच्चन यांना आवाहन केले होते की, त्यांनी गुजरातच्या गाढवांसाठी प्रचार करू नये. अमिताभ बच्चन हे गुजरातच्या पर्यटन विभागाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. दरम्यान, अखिलेश यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेससोबत आज तुम्ही निवडणूक आघाडी केली आहे त्याच काँग्रेसने २०१३ मध्ये गुजरातच्या गाढवांवर पोस्टाचे तिकीट काढले होते. अखिलेशजी, आपली जातीयवादी मानसिकता प्राण्यातही दिसत असून आपल्याला आता गाढवंही वाईट दिसत आहेत. अखिलेश यांना गुजरातच्या गाढवांबाबत एवढा तिरस्कार का? हे तेच गुजरात आहे ज्या राज्याने महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, दयानंद सरस्वती यांच्यासारखे राष्ट्रपुरुष देशाला दिले आहेत, असे मोदी म्हणाले.मोदी म्हणाले की, अखिलेशजी, आपल्या समाजवादी पक्षाचे आमदार अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी मते मागत आहात? मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय गायत्री प्रजापती यांचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की, लोक जेव्हा एखादे शुभ कार्य सुरू करतात. तेव्हा ते गायत्री मंत्राचा जप करतात. पण, इथे असे दोन लोक आहेत जे बलात्काराचा आरोप असणाऱ्या गायत्री प्रसाद प्रजापती यांचा जप करत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी ढासळली आहे हे नमूद करण्यासाठी मोदी यांनी बुधवारीही गायत्री प्रसाद प्रजापती यांचे उदाहरण दिले होते. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असेही आश्वासन मोदी यांनी पुन्हा एकवार दिले.
अखिलेश यांना गाढवांचीही भीती
By admin | Published: February 24, 2017 1:51 AM