ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २ - 'जोपर्यंत देश भाजपामुक्त करत नाही तोपर्यंत सपा-काँग्रेस युती कायम राहील' असा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्ला चढवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. गाझियाबादमधील धौलाना भागातील एका सभेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
२०१४ लोकसभा निवडणुकीपासून भाजपाने ' काँग्रेसमुक्त' भारताचा नारा देत प्रचार सुरू केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता अखिलेश यांनी ' भाजपामुक्त भारत' अशी घोषणा दिली आहे. 'त्यांनी (भाजपा) शक्य होईल तेवढे विष, तेढ, द्वेष पसरवला आहे' अशी टीका अखिलेश यांनी केली. 'मात्र देशात सपाचे सरकार आल्यावर देशाची परिस्थिती बदलेल. आणि बदल घडवण्यासाठी जे कष्ट सहन करावे लागतील ते आम्ही करू. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी आम्ही त्या पार करू. त्यासाठी आम्हाला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली, तर तेही आम्ही करू' असे अखिलेश यांनी नमूद केले.
'दोन्ही पक्षातील (सपा-काँग्रेस) नेत्यांचे विचार समान आहेत. जोपर्यंत आम्ही देशातून भाजपा आणि जातीयवादी पक्ष नष्ट करत नाही., तोपर्यंत आम्ही एकत्र काम करू. त्यामुळेच ते ( भाजपा व इतर पक्ष) आमच्या (सपा-काँग्रेस) युतीला घाबरले आहेत. त्यांना माहीत आहे की, जर त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला तर राष्ट्रीय राजकारणातही ते पराभूत होतील. त्यामुळेच ही निवडणूक अतिशय महत्वाची, प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीमुळे उत्तर प्रदेश आणि देशाचे राजकारण बदलणार आहे' असेही अखिलेश यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात निवडणूक पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील तर ८ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ११ मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल घोषित होणार आहे.