कन्नौज (उत्तर प्रदेश) - एखाद्या सभेत, राजकीय कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले किंवा ऐकले असेल. एखाद्या नेत्याचा ताफा रोखला गेल्याचेही ऐकले असेल. पण काल अखिलेश यादव आणि मायावती यांच्या कन्नौज येथील सभेपूर्वी जे काही झाले ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कन्नौज येथून निवडणूक लढवत असलेल्या अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारासाठी काल कन्नौज येथे अखिलेश यादव आणि बसपाप्रमुख मायावती यांनी मोठी सभा घेतली. मात्र अखिलेश यादव आणि मायावती यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरची घरघर ऐकून गावातील एक मोकाट वळू बुजला आणि त्याने सभास्थळाजवळील हेलिपॅडवर धडक देत गोंधळ घातला. दरम्यान, या वळूला हेलिपॅडवरून पळवून लावण्याच्या प्रयत्नात एक सफाई कर्मचारी आणि एक पोलीस जखमी झाला. मात्र सुदैवाने सभेपूर्वी होणारी मोठी दुर्घटना टळली.
कन्नौज येथे डिंपल यादव यांच्या प्रचारासाठी मायावती आणि अखिलेश यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच दोन्ही नेत्यांना घेऊन येण्यासाठी परिसरात एका तात्पुरत्या हेलिपॅडचीही उभारणी झाली होती. मात्र दोन्ही नेत्यांचे आगमन होण्यापूर्वी तिथे एक मोकाट वळू घुसला. तसेच हेलिकॉप्टरची घरघर ऐकून तो बुजला. तसेच तिथे असलेल्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला. दरम्यान, तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून या वळूचा बंदोबस्त केला.
मात्र या वळूला रोखण्याच्या प्रयत्नात दोन जण जखमी झाले. तसेच बघ्यांचीही बरीच पळापळ झाली. या घटनेचा अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी सभास्थळाजवळील हेलिपॅडवर वळू घुसला होता.