ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14 - समाजवादी पक्षातील अशांतता अजून कायम असल्याचं दिसत आहे. मुलायम सिंग यादव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही असं सांगितलं आहे. यावरुन तरी मुलायम सिंग यादव अखिलेश यांच्यावर नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत अखिलेश यादव समाजवादी पक्षाचा मुख्य चेहरा होते.
मुलायम सिंग यादव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सर्व पक्षांना सहकार करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, आमदार मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील असं स्पष्ट केलं आहे.
अखिलेश यादव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गरज पडल्यास आपण एकटेच प्रचाराला उतरु असं सांगितलं होतं. यातून नेमकं अखिलेश यांना काय सांगायचं होतं याचा अंदाज लावला जात आहे. मात्र मुलायम सिंग यादव यांनी कोणताही कौटुंबिक कलह नसल्याचं सांगितलं आहे. तसंच आज पक्ष ज्या ठिकाणी पोहोचला आहे तो माझ्यामुळेच असंही सांगायला विसरले नाहीत.
We never had any division in our family, neither will have in future: SP chief Mulayam Singh Yadav pic.twitter.com/BaUimwFgX9— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2016
गेल्या काही दिवसांमध्ये समाजवादी पक्षातील कौटुंबिक कलह समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना समाजवादी पक्षात मात्र यादवी माजली होती. काका - पुतण्याच्या संघर्षामुळे राजकीय संकट उभं राहण्याची शक्यता असताना मुलायमसिंह यादव मात्र सर्व काही आलबेल आहे असल्याचं सांगितलं होतं. शिवपाल सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातील मतेभद सर्वासमोर आले होते. मात्र मुलायम सिंग यादव यांनी शिवपाल यांना साथ दिली आणि प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.