लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त एक ट्विट केलंय. त्यावरुन, त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर शेम ऑन अखिलेश यादव हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी समाजवादी पक्षाकडून 'दलित दिवाळी' साजरी करण्यात येईल, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.
अखिलेश यादव यांच्या या ट्विटनंतर नेटीझन्स संतापले असून अखिलेश यांना ट्रोल करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हते, त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी आपला लढा दिला. बाबासाहेबांनी संविधान देशातील प्रत्येक नागरिकांसाठी लिहिल्याची आठवण अनेकांनी अखिलेश यांना करुन दिली आहे.
भाजपाच्या राजकीय आमवस्या काळात संविधान धोक्यात आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी देशाला नवी प्रकाशवाट दिली. त्यामुळेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी समाजवादी पक्षातर्फे उत्तर प्रदेश, देश आणि विदेशात 'दलित दिवाळी' साजरी करण्याचे आव्हान करते, असे ट्विट अखिलेश यांनी केले आहे. त्यानंतर, ट्विटरवर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीविषयी निश्चितच अखिलेश यांना काही माहितीच नाही. आयुष्यभर ते जातिव्यवस्था आणि अस्मितेच्या राजकारणाविरोधात लढले. मात्र, एका विशिष्ट समुदायाला संघटीत करण्यासाठी अखिलेश यांच्याकडून बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग होत आहे. दलितांना मूर्ख बनवण्याऐवजी त्यांच्या उत्कर्षासाठी काम करा, असे ट्विट करत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनीही अखिलेश यादव यांना सुनावलं आहे.
दरम्यान, अखिलेख यादव यांनी माफी मागावी, असेही नेटीझन्सने ट्विटरवरुन सूचवले असून #Shame_On_You_AkhileshYadav हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.