नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्तानं 21 विरोधी पक्षांचे नेते या तिन्ही शपथविधी समारंभांना उपस्थित राहणार आहेत. यानिमित्तानं विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. परंतु विरोधकांच्या या शक्तिप्रदर्शनाआधीच त्यांच्या एकीला सुरुंग लागला आहे. या शपथविधी सोहळ्याला सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती आणि टीएमसीच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत बसपानं काँग्रेसला पाठिंबा दिला असतानाही मायावती उपस्थित राहणार नसल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सध्या या विरोधी पक्षांचा गट जी-21 नावाने ओळखला जात असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आगामी लोकसभा निवडणुकीत खाली खेचण्यासाठी हा एकत्र आला आहे. राजकारणात अस्पृश्य असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसने या शपथविधी समारंभांसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे.
तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:50 AM